लोकजागर : मुकुंद संगोराम

mukund.sangoram@expressindia.com

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कचरा गोळा करण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत नव्यानेच आलेल्या कुणा अन्य संस्थेला देण्यासाठी पालिकेतील सगळे अधिकारी अतिशय आसुसले आहेत. काहीही करून हे काम गेली काही वर्षे करीत असलेल्या ‘स्वच्छ’ या संस्थेकडून काढून घ्यायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. स्वच्छ या संस्थेकडून हे काम काढून घेण्याचा उद्धटपणा करण्याऐवजी त्यांनी ते आपणहून सोडावे, अशी पुणे महानगरपालिकेची इच्छा आहे. त्यासाठी सगळेजण जंगजंग प्रयत्न करत आहेत. त्यातला एक सोपा मार्ग म्हणजे स्वच्छ संस्थेशी असलेले कंत्राट दीर्घ काळासाठी न करता केवळ महिन्यापुरतेच करत राहायचे आणि त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून द्यायची. जेणेकरून ती संस्था आपणहून हे काम करण्यास नकार देईल. म्हणजे मग रांगेत उभ्या केलेल्या ‘आपल्या’ संस्थेला अधिक पैसे देऊन काम देता येईल. हे सगळे दिवसाढवळ्या सुरू आहे आणि सर्वजण त्याकडे निर्लज्जपणे पाहात बसले आहेत. पुणे महापालिकेला कोणतेही काम धडपणे जमत नाही, हे आजवर इतक्यांदा सिद्ध झाले आहे, की पुण्यातील नागरिकांनी आता पालिकेलाच ओवाळून टाकायचे बाकी राहिले आहे.

एकेकाळी शहरातील कचरा उचलण्याचे काम पालिका स्वत: करायची. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कचरावेचकांची नियुक्ती करण्यात आली होती. रस्ते बांधणी आणि त्यांची देखभाल-दुरुस्तीचे कामही पालिकाच करत असे. रस्त्यांवरील झाडांची पावसाळ्यापूर्वीची छाटणी असो की, नालेसफाई असो. पीएमपीएल असो की बेकायदा उभारण्यात आलेले जाहिरात फलक काढण्याचे काम असो. प्रत्येक कामाचे आता ‘टेंडर’ निघते. ते कोणाला द्यायचे हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने ते काम पूर्णत्वाला नेलेच पाहिजे, असा आग्रह असत नाही. शिवाय मर्जीतल्या ठेकेदाराकडून ख्याली खुशाली मिळते. पालिकेला एकही काम स्वत:च्या हिकमतीवर करता येत नाही. जे कंत्राटदार काम उत्तम करतात, त्यांच्याकडून ते काढून घेण्याचेच कारस्थान फक्त सर्वाना करता येते.

कचरा हा शहराच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे, त्यामुळे तो अधिक गंभीर आहे. स्वच्छ ही संस्था ते नीटपणे करत नाही, असे जर पालिकेला वाटत असेल, तर त्यासाठी शहरातील नागरिकांनी पुरेशा प्रमाणात तक्रारी केलेल्या असल्या पाहिजेत. यातील काहीही घडले नसताना, या संस्थेशी असलेले कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू करणे, म्हणजे पालिकेतील कुणा अधिकाऱ्याच्या मदतीने स्वहित जपण्यासारखे आहे. करोना काळात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना, सर्व नगरसेवकांना सुशोभीकरणासाठी पैसे हवे आहेत. ते कशासाठी, हे न समजण्याएवढे पुणेकर मठ्ठ नाहीत. तरीही अतिशय निर्लज्जपणे हे सगळे व्यवहार सुखाने सुरू आहेत. स्वच्छकडून कचरा उचलण्याचे काम काढून घ्यायचे, तर कंत्राट थेट रद्द करण्याची हिंमत पालिकेकडे नाही. खूप छळ करून ती संस्था आपणहून बाहेर पडेल, अशी व्यवस्था करण्याचे काही कारणच नाही. त्यामुळे स्वच्छकडून शहरातील कचरा उचलण्याचे काम काढून घेण्यामागे काहीएक षड्यंत्र आहे, असा दावा करता येऊ शकतो. तो खरा असल्याचे अनेकजण खासगीत सांगतातही.

त्यामुळे हा असला हुच्चपणा पालिकेने तातडीने सोडून द्यावा. प्रत्येक कंत्राटातून लाभाची अपेक्षा करण्यापेक्षा शहराच्या हिताची अपेक्षा करणे, हे अधिक योग्य. ते करणे जमत नसेलच, तर मग अख्खी पुणे महानगरपालिका चालविण्याचेही कंत्राट देऊन टाकावे, पालिके ला कोणतेही काम धडपणे करता येत नाही आणि आपण काहीच कामाचे नाही, हे जाहीर करून टाकावे. स्वच्छचे कंत्राट एकएक महिन्यांनी वाढवत ठेवण्याच्या या कृतीने आपण फार हुशार आहोत, असे भासवणाऱ्या अधिकाऱ्याचे कान महापौर आणि आयुक्तांनीच उपटायला हवेत.