पुणे : पुणे विमातळावर शुक्रवारी सकाळी विमानांचा मार्ग काही काळ पक्ष्यांनी रोखून धरला. यामुळे विमानसेवेला फटका बसला. पुण्याकडे येणारी काही विमाने दुसरीकडे वळविण्यात आली, तर काही विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला.

पुणे विमानतळावर सकाळी मोठ्या संख्येने पक्ष्यांच्या घिरट्या सुरू होत्या. त्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाला धावपट्टी काही काळ तात्पुरती बंद करावी लागली. यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे उड्डाण विलंबाने झाले. हे विमान सकाळी ११.१५ वाजता उड्डाण करणार होते; परंतु, प्रत्यक्षात त्याचे उड्डाण दुपारी १२.३० वाजता झाले. याबाबत प्रवाशांनी समाजमाध्यमावर तक्रारी केल्या आहेत. विस्ताराचे दिल्ली ते पुणे हे विमान मुंबईला वळविण्यात आले. हे विमान मुंबईत सकाळी ११.३० वाजता पोहोचले. त्यानंतर हे विमान मुंबईहून दुपारी १.१० वाजता रवाना होऊन पुण्यात १.३० वाजता पोहोचले.

हेही वाचा >>>सीबीएसईची शाळांना दिली महत्त्वाची सूचना… वाढते गुण रोखणार?

एअर इंडियाचे मुंबई ते पुणे हे विमान पुणे विमानतळाच्या हवाई हद्दीत आले होते. त्याला विमानळावर उतरण्यास नियंत्रण कक्षाने परवानगी नाकारली. हे विमान सकाळी १०.५० वाजता पुणे विमानतळावर उतरणे नियोजित होते. नियंत्रण कक्षाने परवानगी नाकारल्याने हे विमान हवेत घिरट्या घालत राहिले. अखेर हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर पाठविण्यात आले. याबाबत रोहित मोटवानी या प्रवाशाने समाजमाध्यमावर आपला अनुभव मांडला आहे. त्याने म्हटले आहे, की मी आज एअर इंडियाच्या मुंबई ते पुणे विमानाने प्रवास करीत होतो. पुणे विमानतळावर हे विमान सुमारे तासभर घिरट्या घालत होते. विमानतळावर घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने विमान उतरविणे शक्य नसल्याची माहिती वैमानिकाने प्रवाशांना दिली. त्यानंतर हे विमान पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

पक्ष्यांमुळे दुर्घटनेचा धोका

पक्ष्याची धडक विमानाला बसण्याच्या घटनांची नोंद केवळ भारतात नव्हे, तर जगभरात मोठ्या प्रमाणात होते. विमान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय गंभीर बाब आहे. पक्ष्याची धडक विमानाला बसून अनेक दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. पक्ष्याची धडक बसल्याने अपघात घडण्याचा धोका असला, तरी मोठी दुर्घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक वेळा विमानाचे नुकसान होते अथवा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने विमान विमानतळावर उतरवावे लागते.