scorecardresearch

पुणे : खडकीच्या सीएएफव्हीडी मैदानाजवळ आढळला अनोळखी मुलीचा मृतदेह

अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून केरून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

crime news
(संग्रहित छायाचित्र)

अडीच ते तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार खडकी येथे उघडकीस आला आहे. खडकी येथील सीएएफव्हीडी मैदानाजवळ आढळून आलेल्या अनोळखी मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुढील आठवड्यात बँका तीन दिवस बंद

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. खडकी रेल्वे स्थानक ते खडकी बाजार या रस्त्याच्या दक्षिणेला असलेल्या सीएएफव्हीडी मैदानावरील चिकूच्या झाडाजवळ तीन वर्षाची मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून खडकी पोलिसांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून खडकी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. मुलीच्या गळ्यावर बोटांचे ठसे आढळून आले. पोलिसांनी मुलीला ससून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा- ‘कॅशबॅक’च्या लाभपोटी पावणेदोन लाख गमावले

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, घटना घडली ते ठिकाण निर्जन आहे. तेथून जात असताना एका रिक्षाचालकाला झाडाजवळ एक मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तीन वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसले. तिला ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून केरून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मुलीची ओळख पटविण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना माहिती पाठविण्यात आली आहे. तसेच समाजमाध्यमाद्वारे माहिती प्रसारित करण्यात आली आहे. तीन वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे का, या आधारे तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 20:04 IST