कसबा पोटनिवडणुकीसाठी अंमलबजावणी सुरू असलेल्या आचारसंहितेचा भंग भारतीय जनता पक्षाकडून झाला आहे. कसब्यातून पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्वत:चे नाव आणि छायाचित्र तसेच पक्षाचे चिन्ह असलेल्या साहित्याचे वाटप एका कार्यक्रमावेळी केल्याचे पुढे आले आहे. आचारसंहितेमधील साहित्य वितरणाचा ह कार्यक्रम वादात सापडण्याची शक्यता असून विरोधकांकडून त्याविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: बीबीसी निर्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाचे ‘एफटीआयआय’मध्ये प्रदर्शन
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये हेमंत रासने यांचे नावही चर्चेत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारसंघात निवडणूक आचारसंहिताही लागू झाली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र त्यानंतरही हेमंत रासने यांनी साहित्याचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>‘भारत जोडो’ यात्रेमुळे महाविकास आघाडीची पोटनिवडणूक बैठक लांबणीवर; शहर पदाधिकारी यात्रेसाठी काश्मीरला रवाना
हेमंत रासने मित्र परिवारातर्फे बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रम तसेच हळदी कुंकू आणि मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर महिलांना हेमंत रासने यांचे नाव, छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या पिशव्यांवर भाजपचे कमळ चिन्हही दिसत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्याविरोधात जिल्हा प्रशासनाकडेही तक्रार नोंदविण्यात येणार आहे, असे विरोधकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सर्वेक्षण, तीन संस्थांची नेमणूक
हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे होतो आहे. कार्यक्रमापूर्वी शासकीय अधिका-यांची चर्चा करण्यात आली होती. त्यांच्या सूचनेनुसार पक्षाचे झेंडे काढण्यात आले. हा कार्यक्रम खासगी आहे आणि तो खासगी ठिकाणी झाला आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे आचारसंहितेचा कोणताही भंग झालेला नाही, असे हेमंत रासने यांनी सांगितले.