पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी सात नावे पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आली आहेत. काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. रविवारपर्यंत (५ फेब्रुवारी) उमेदवार कोण असेल ते जाहीर करण्यात येईल. कोणाच्याही नावावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले.
पटोले यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला येथे काँग्रेसची बैठक पार पडली. कसबा पोटनिवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसकडून कसब्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले रविंद्र धंगेकर, निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, की कसब्यातून इच्छुक असलेल्या सात जणांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठविली आहेत. उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. रविवारी उमेदवार निश्चित केला जाईल. कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे.
दरम्यान, धंगेकर हे कसबा पोट निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळाल्याचा दावा करत जल्लोष देखील केला होता. मात्र, काँग्रेसकडून अजून उमेदवार अंतिम झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता धंगेकर स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटण्यासाठी खडकवासला येथे बैठकीसाठी गेले होते.
हेही वाचा >>> कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच आचारसंहिता भंगाच्या ५२ तक्रारी
सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर उत्तर टाळले
माझ्याकडेही भरपूर मसाला आहे. मी यापूर्वीही इशारा दिला होता की, मला बोलायला लावू नका. घरातील वाद बाहेर आणू नका, असे सांगून पटोले यांनी तांबे यांच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलतील असे म्हणत भाष्य करणे टाळले.