भाई वैद्य यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला गर्दी; सर्वसामान्यांसह कार्यकर्ते, मान्यवरांची हजेरी

संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजातील विविध घटकातील लोकांना हजेरी लावली होती.

माजी गृहराज्यमंत्री आणि जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले. दरम्यान, दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. भाई वैद्य यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून राष्ट्रसेवा दलातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह, नागरिक आणि अनेक मान्यवरांनी येथे हजेरी लावली आहे.

भाई वैद्य यांचे काल पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्यावर त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी साने गुरुजी भवनामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी भाई वैद्य यांचे चिरंजीव अभिजित वैद्य आणि त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या मंडळींनी हजेरी लावून अभिजित वैद्य यांचे सांत्वन केले. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अंकुश काकडे, अनंतराव थोपटे, शां. ब. मुजुमदार आदींनी भाई वैद्य यांचे अंत्यदर्शन घेतले.

दरम्यान, आद्यापही भाई वैद्य यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांची साने गुरुजी स्मारक येथे येत आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The crowd gathered in the introspection of bhai vaidya public political leader social activist present

ताज्या बातम्या