भरधाव वेगात असणाऱ्या कारचा पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघात झाला, डिव्हायडरचा पत्रा थेट चालकाच्या पायात शिरल्याने पाय जायबंदी झाला. दरम्यान, कार मालक डॉक्टरांनी अपघातग्रस्त ठिकाणीच तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. सलाईन लावत इंजेक्शन दिले. कारमध्ये अडकलेल्या चालकाला काढण्यासाठी दीड तास लागला. त्यानंतर तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने चालकाचे प्राण वाचले आहेत. ओंकार रोनडाळे असे चालकाचे नाव आहे. तर, डॉ. सुनील मेहता असे डॉक्टरांचे नाव आहे.

गुरुवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव वेगात असणाऱ्या कारवरील चालक ओंकार यांचे नियंत्रण सुटले आणि कार पत्राच्या डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात चालकाच्या मांडीत पत्रा शिरल्याने मोठा रक्तस्त्राव सुरू झाला होता. तर, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. कारमध्ये डॉक्टर सुनील मेहता देखील होते. त्यांनी तातडीने मेडिकल किट काढून चालकावर उपचार सुरू केले. पत्रा, चालकाच्या मांडीत आरपार गेला होता.

बचावकार्य दीड तास चालले. तोपर्यंत चालक ओंकारला शुद्धीवर ठेवण्याचं काम डॉक्टरांनी केलं. हा अपघात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला होता. स्वतः अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांनी चालकावर अपघातग्रस्त मोटारीत उपचार करून त्याचे प्राण वाचविल्याने कौतुक होत आहे.