पुणे : गुलाब चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील ४८ तास कायम राहणार असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा अंदाज असून विदर्भ, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून मंगळवारी सांगण्यात आले.

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्य़ात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्य़ात रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर के ला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्य़ातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्य़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्य़ात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगांव या पाच जिल्ह्य़ांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदूरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्य़ांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे.