पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे. अलस्टॉम या कंपनीने श्रीसिटी (आंध्रप्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनवटीची आहे. ही मेट्रो रविवारी (२ जून) या मार्गिकेच्या माण येथील आगारात दाखल होणार आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे.

टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला या प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी ८५ किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दररोज प्रवास करताना पुणेकरांना अतिशय सुखद अनुभूती मिळावी, या दृष्टीने या गाड्यांचे आरेखन करण्यात आले आहे. या गाड्यांची अंतर्गत रचना आणि सजावट करताना प्रवाशांच्या गरजा आणि आराम याकडे विशेष लक्ष पुरविले आहे. रंगसंगती, आकर्षक आरेखन, शारीरिक विकलांग प्रवाशांना सुलभता प्राप्त करून देणारी रचना आहे, असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालिका नेहा पंडित यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first metro for the hinjewadi shivajinagar route has entered pune print news amy
First published on: 01-06-2024 at 23:40 IST