झेंडू १०० ते १४० रुपये किलो

दसऱ्याच्या आधी दोन ते तीन दिवस श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूची आवक सुरू होते.

फूल बाजार बहरला; दसऱ्याच्या खरेदीसाठी गर्दी

पुणे : दसऱ्याच्या खरेदीसाठी फूल बाजार बहरला असून किरकोळ बाजारात लाल, पिवळ्या झेंडूची विक्री १०० ते १४० रुपये प्रतिकिलो या दराने केली जात आहे. दसऱ्याच्या खरेदीसाठी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजार तसेच मंडईतील हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाने उघडीप दिल्याने झेंडूला चांगले दर मिळाल्याने शेतक ऱ्यांनाही दिलासा मिळाला.

दसऱ्याच्या आधी दोन ते तीन दिवस श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूची आवक सुरू होते. मध्यंतरी परतीच्या पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला होता तसेच फुलेही भिजली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. शेतक ऱ्यांना अपेक्षेएवढे दर मिळाले आहेत. सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून झेंडूच्या फुलांची आवक फूल बाजारात झाली. कर्नाटकातील झेंडूची आवक यंदा झाली नाही, असे फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसांत झेंडूची आवक वाढणार आहे. झेंडूसह शेवंती, गुलछडी, जुई, चमेली या फुलांना चांगली मागणी आहे. सुक्या फुलांना चांगले दर मिळाले आहेत. मंदिरे उघडण्यात आल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. हार विक्रेत्यांसह किरकोळ ग्राहकांकडून फुलांना मागणी आहे. घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांना आकार तसेच रंगानुसार प्रतिकिलो ४० ते ८० रुपये असे दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो झेंडूला १०० ते १३० रुपये असा दर मिळाला असल्याचे भोसले यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी फुलांची लागवड कमी प्रमाणावर करण्यात आली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची आवक वाढली असून दरही चांगले मिळाले आहेत. पुढील दिवस फुलांना चांगली मागणी राहील. पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे फूल व्यापारी अरुण वीर यांनी सांगितले.

मंडई परिसरात गर्दी

दसऱ्याच्या खरेदीसाठी मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. हार, फुले, पेढे, आपट्याची पाने तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याने मंडई परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या भागातून चालणे देखील अवघड झाले होते.

किरकोळ बाजारातील फुलांचे दर

झेंडू- १०० ते १४० रुपये

शेवंती- ६० ते १५० रुपये

गुलछडी- १८० ते २८० रुपये

चमेली- १२०० रुपये

जुई- १२०० ते १५०० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The flower market flourished crowds akp