बीडमधील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील फरार असलेल्या व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर पिता पुत्रांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील साडेचार लाख ठेवीदारांची कोट्यवधीची फसवणूक केली होती. अखेर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ५२ शाखांमधील साडेचार लाख ठेवीदारांची ३,५१५ कोटींनी फसवणूक केली होती. या घोटाळ्यानंतर व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर पिता पुत्र हे तीन महिन्यांपासून फरार होते. त्यांना अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अधिकच्या तपासासाठी दोन्ही पिता-पुत्रांना बीड पोलिसांच्या स्वाधीन केल आहे. मराठवाड्यातील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा हा घोटाळा चांगला चर्चेचा विषय ठरला होता. यशवंत कुलकर्णी हे चेअरमन असून वैभव कुलकर्णी हे डायरेक्टर आहेत. या दोघांनाही वाकडच्या फिनोलेक्स मॉल या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं.
हेही वाचा – पुणे : कोथिंबिरीला उच्चांकी भाव, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दर
हेही वाचा – पुणे : वडापाव पाच लाखांना; ज्येष्ठाकडील दागिन्यांची पिशवी लंपास, हडपसर भागतील घटना
व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर यांच्यावर वेगवेगळ्या ४२ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.