सहकारात घोटाळा होतो, असे कायम सांगितले जाते. मात्र सहकारी बँकांमध्ये घोटाळ्याचे प्रमाण अर्धा टक्काही नाही. देशातील एकूण बँकिंग क्षेत्रातील ९२ टक्के घोटाळे खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये होतात, तर सहकारी बँकांमध्ये हे प्रमाण ०.४६ टक्के एवढे अत्यल्प आहे. त्यामुळे केंद्र सरकाराने सहकाराशी बांधिलकी ठेवून या बँकांबाबत सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवावा आणि त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे गुरुवारी व्यक्त केले.
दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ आणि ’विश्वार्थ’ या गौरविकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना पवार यांनी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणावर भर दिला. ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, उपाध्यक्ष अजय डोईजड, सुवर्ण महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष अनिल गाडवे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, ज्येष्ठ संचालक बापूसाहेब धनकवडे, लेखक विद्याधर ताठे, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. या वेळी पवार यांच्या हस्ते बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवा तसेच मोबाईल बँकिंग ॲपचे उदघाटन करण्यात आले.
पवार म्हणाले, महाराष्ट्राचे सहकार चळवळीत वेगळे स्थान आहे. एकूण १ हजार ५१४ सहकारी बँकांमध्ये क्रमांक एकच्या बँका महाष्ट्रात आहेत. गुजरात आणि कर्नाटकचा त्यानंतर क्रमांक लागतो. सहकार चळवळीसाठी कामे करणारे वैकुंठभाई मेहता आणि धनंजय गाडगीळ यांच्या पाठीशी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या सारख्या जाणत्या लोकांचे नेतृत्व लाभल्याने राज्यातील सहकार चळवळ मजबूत झाली. सहकारी बँकांची नाडी परीक्षा करताना सकल आणि निव्वळ अनुत्पादक कर्जे (एनपी) पहावा लागतो. सहकारी बँकांकडून घेतलेले पैसे परत करण्याची सवय आणि शिस्त खातेदारांमध्ये अपेक्षित असते.
देशातील बँकिंग क्षेत्राकडे पाहिल्यानंतर मात्र अस्वस्थता दिसते. केंद्र सरकारला यंदा बँकांमध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागली. ही गुंतणूक झाली नसती तर बँकांचे आरोग्य बिघडले असते. देशातील बँकांमध्ये घोटाळे होतात. त्यात सहकारात घोटाळे होतात, असे सातत्याने सांगितले जाते. मात्र खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ९२ टक्के घोटाळे होतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याउलट सहकार क्षेत्रात ०.४६ टक्के एवढे घोटाळे होतात. त्यामुळे सहकारी बँकांना शक्ती देणे आवश्यक आहे. सहकारी बँका सामान्य लोकांची जपणूक करणाऱ्या बँका आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे बँकांबाबत केंद्र सरकारचा दृष्टिकोन कायमच सहानुभूतीचा असावा, असे पवार यांनी नमूद केले.
सुरक्षित आणि विश्वासह बँकांबाबत असावा लागतो. यामध्ये विश्वेश्वर बँकेचे समावेश आहे. सहकार सर्वसामान्यांच्या प्रगतीचा शाश्वत मार्ग आहे. त्यासाठी सहकार क्षेत्राला दिशा देण्याची आवश्यकता असून सहकार चळवळ वाढविण्याची जबाबदारी सहकारी बँकांची आहे, असे ज्येष्ठ सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.