पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त दूरदर्शनने निर्मिती केलेली ‘स्वराज : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका पाहण्याची व मालिकेवर आधारित प्रश्नमंजूषा आयोजित करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना केली आहे. एकीकडे ‘ओटीटी’ मालिका देशातील गावोगावांत अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाल्या असताना ‘डीडी’वरील कार्यक्रम आग्रह कितपत गांभीर्याने घेतला जाईल याबाबत शिक्षण वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या आदेशासंदर्भातील परिपत्रकासह दूरदर्शनवरील मालिकेचे वेळापत्रक  संकेतस्थळावर गुरुवारी प्रसिद्ध केले. केंद्र सरकारकडून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असल्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दूरदर्शनने ‘स्वराज : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ या ७५ भागांच्या भव्यदिव्य मालिकेची निर्मिती केली आहे.

टीव्ही मालिकेत काय?

या मालिकेतून १५व्या शतकापासून स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा गौरवशाली इतिहास आणि विशेषकरून अपरिचित नायकांच्या कथा मांडण्यात आल्या आहेत. देशाचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासह पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याचा या मालिकेचा भर आहे, असे यूजीसीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाविद्यालयांना सूचना..

उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांसमवेत ही मालिका पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच स्वराज्य या विषयावर आधारित प्रश्नमंजूषेचे संस्थेमध्ये आयोजन करून त्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग वाढवावा.