पुणे : हवामान विभागाने राज्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरीही सायंकाळपासून पुणे शहरात पावसाचा जोर वाढला आहे. रात्री नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. संतधार पाऊस, खडकवासला धरण साखळीतून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील रस्ते बंद आहेत. शिवाय शहराच्या विविध चौकांमध्ये मंगळवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या तयारी सुरू असल्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

शहर आणि परिसरात संततधार पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहत होते. सकल भागात पाण्याची तळी साचली आहेत. शहरातील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू आहे. पण, संततधार पावसामुळे व्यत्यय येत आहे. यासह शहराच्या मध्यवर्ती भागात विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू आहे. या मंडळाच्या सजावटीच्या कामात पावसामुळे मोठा व्यत्यय आला.

हेही वाचा – सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?

हेही वाचा – बटाट्यापासून आता इथेनॉल निर्मिती ? जाणून घ्या, केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचा प्रयोग

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ते बंद आहेत. शहरातील अनेक चौकांमध्ये मंगळवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.