मोसमी पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विसर्जनाच्या दिवशी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याच भागासह मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात गेल्या आठवड्यापासून विदर्भासह काही तुरळक भागांतच पावसाची हजेरी होत आहे. या काळात बहुतांश भागात निरभ्र आकाशामुळे कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्रीचा उकाडा वाढला होता. या दोन ते तीन दिवसांत पुन्हा बदल होणार आहे. मोसमी पावसाची आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा मध्य भारताच्या जवळ येणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून त्याचप्रमाणे अरबी समुद्रातून बाष्प येणार आहे. परिणामी ८ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : “मी नाराज आहे,” भाजपा खासदार गिरीश बापट स्पष्टच बोलले; म्हणाले “पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक…”

कोकणामध्ये ८ सप्टेंबरपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही याच काळात घाट विभागांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, विदर्भातही बहुतांश भागात पाऊस होणार आहे.

पाऊस कुठे?

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत ८,९ सप्टेंबरला काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नगर, कोल्हापूर, सातारा, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांतही याच कालावधीत जोरधारांचा अंदाज आहे. पुणे, परभणी, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर आदी भागांतही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे