लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: येरवडा भागात कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. तरुणाचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक नाईकनवरे, चिकू नाईकनवरे, अभिषेक बडे, श्री पाटोळे, प्रियांशू वैरागर (सर्व रा. गांधीनगर, येरवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अभिजीत अप्पासाहेब दुशिंग (वय ४०, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रतिक नाईकनवरे याची सागर हुले याच्याशी भांडणे झाली होती. अभिजीत दुशिंग यांनी भांडणात मध्यस्थी करुन भांडणे सोडविली होती. त्या वेळी दुशिंग यांनी नाईकनवरे याच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे नाईकनवरे दुशिंग यांच्यावर चिडून होता.

हेही वाचा… पुणे: किराणा माल दुकानात बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली; गॅस गळती होऊन भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

त्यानंतर आरोपी नाईकनवरे यांनी दुशिंग यांच्या मुलाला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर दुशिंग जाब विचारण्यासाठी नाईकनवरे याच्याकडे गेले. आरोपींनी नाईकनवरे, बडे, पाटोळी, वैरागर यांनी दुशिंग यांच्यावर कोयते उगारले. दुशिंग यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर दुशिंग जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. आरोपींनी दुशिंग यांचा पाठलाग केला. कोणी मध्ये येऊ नका, याला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. कोयते उगारुन दहशत माजविल्याने नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

Story img Loader