पुणे : पुणे शहरात शुक्रवारी (११ नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेल्याने शुक्रवारीही पुणे राज्यातील सर्वात थंड शहर ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार १३ नोव्हेंबरपासून शहरात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ, तर दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात सध्या किमान तापमानात मोठी घट असल्याने रात्री गारवा जाणवतो आहे. पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात चार वेळा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ३० ऑक्टोबरला शहरात १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे नीचांकी तापमान ठरले. त्याच दिवशी हे तापमान राज्यातही नीचांकी होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरला १३.१ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी (१० नोव्हेंबर) पुण्यात १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान पुन्हा राज्यातील नीचांकी तापमान ठरले. त्यानंतर शुक्रवारीही सलग दुसऱ्या दिवशी १२.८ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद शहरात झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.९ अंशांनी कमी होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lowest temperature in the state pune print news ysh
First published on: 11-11-2022 at 22:25 IST