पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कर्करोग रुग्णालय उभारणीला अखेर गती मिळाली आहे. थेरगावमध्ये ३४ गुंठे जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. निविदेला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर एका ठेकेदाराची निविदा महापालिका प्रशासनाने स्वीकारली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. हे १०० खाटांचे रुग्णालय दाेन वर्षांत सुरू करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘वायसीएम’सह आठ माेठी रुग्णालये आहेत. मात्र, एकाही रुग्णालयात कर्कराेगावरील उपचारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने थेरगावातील नवीन रुग्णालयाशेजारी असलेल्या ३४ गुंठे माेकळ्या जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले.सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. निविदेला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही एकच ठेकेदार सहभागी झाला. त्यामुळे या ठेकेदाराला काम देण्याचे निश्चित करण्यात आले. ठेकेदाराला ३० वर्षांसाठी जागा दिली जाणार आहे. ठेकेदाराने दोन वर्षांत ११ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. यंत्रसामग्री, मनुष्यबळ, रुग्णालय चालविण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. महापालिका ठेकेदाराला ६० कोटींचा तफावत निधी देणार आहे.

केमो थेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, समुपदेशनासारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. हे रुग्णालय स्तन, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. रुग्णालयामध्ये लीनिअर एक्सलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनची सुविधाही देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गाेफणे यांनी सांगितले.

अल्प दरांत उपचार

महापालिकेने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे दर निश्चित केले आहेत. ठेकेदाराला या दराप्रमाणेच पैसे घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे अल्पदरात उपचार मिळणार आहेत.

निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रस्ताव दर पडताळणीसाठी निविदा समितीकडे पाठविला आहे. त्यानंतर स्थायी समितीची मान्यता घेऊन कामाचा आदेश दिला जाईल. इमारतीचे काम दोन वर्षांत पूर्ण करून रुग्णालय सुरू करण्यात येईल. रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल.-विजयकुमार खोराटे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका