उमेदवार यादी जाहीर होण्याची वाट पाहत बसण्याऐवजी सर्वपक्षीय इच्छुकांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनीही समाजमाध्यमांवर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या समाजमाध्यमांवर असलेल्या पुण्यातील मतदारांना ‘सोशल वॉर’ पाहायला मिळत आहे.

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून समाजमाध्यमांचा वापर सर्व पक्षांकडून यंदाच्या महापालिका निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांच्या वॉर रूम सज्ज झाल्या आहेत. प्रत्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर समाजमाध्यमांवरील हे युद्ध आणखी तीव्र होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला केवळ एकवीस दिवस राहिले असून २१ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. अधिकृत उमेदवार जाहीर होईपर्यंत सर्वपक्षीय इच्छुक आणि राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात समाजमाध्यमांतून केली आहे.

भाजपाने सर्व ४१ प्रभागांत समाजमाध्यमातून प्रचार करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसच्या माध्यमातून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शहरातील ४१ प्रभागांसाठी ४१ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. भाजपप्रमाणेच इतर पक्षांनीही समाजमाध्यमांवर भर दिला असून सत्ताधारी पक्षांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि आगामी कामांचा तपशील यांचा प्रचार सुरू केला आहे. तर विरोधी पक्षांनी गेल्या दहा वर्षांत शहरात विकास झालेला नाही, अशा प्रकारचा प्रसार समाजमाध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक पेज, व्हॉट्स अ‍ॅपवरून छायाचित्रे आणि माहिती, ट्विटरवरून कमीत कमी शब्दांत छायाचित्रासह संदेश, इन्स्टाग्रामवरून संदेश देणारी छायाचित्रे प्रचाराचा भाग म्हणून प्रसिद्ध केली जात आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण सर्व पक्षांनी करून घेतले असून त्यानुसार प्रचार केला जात आहे.

समाजमाध्यमांवरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सीओपी’ हे अ‍ॅप तयार केले आहे. आचारसंहितेच्या काळात होणाऱ्या गैरप्रचाराविरुद्ध तक्रार देण्याचे आवाहनही निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे.