पुणे : सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने धायरीतील एका सराफी पेढीच्या मालकाने ३६ जणांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली, तसेच २१ तोळे सोन्याचा अपहार केला. याप्रकरणी सराफी पेढीच्या मालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सराफी पेढीचे मालक आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीतील सराफी पेढीत सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीने या योजनेत एक लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. तक्रारदाराने १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडले.

मोडीतून आलेले एक लाख ९ हजार रुपये, तसेच आणखी एक लाख रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात पेढीत दिले होते. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून तीन लाख ३९ हजार रुपये जमा केले होते. २५ मे रोजी तक्रारदार सराफी पेढीत गेले. तेव्हा सराफी पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने चाैकशी केली. तेव्हा सराफी पेढीचे मालक पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत तक्रारदारासह ३६ जणांनी या सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतविले होते. एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये, तसेच २१ तोळे सोन्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून पसार झालेल्या दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.