पुणे : रामवाडी मेट्रो स्थानक ते ईऑन आयटी पार्क या मेट्रोपूरक सेवेचा (फीडर सेवा) विस्तार करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार खराडी येथील इंटरनॅशनल टेक पार्कपर्यंत ही पूरक सेवा सुरू राहणार आहे. या सेवेमुळे मेट्रोच्या प्रवाशांना पीएमपीच्या माध्यमातून मेट्रो स्थानकापर्यंत वेळेत पोहोचता येणे शक्य होणार आहे. पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीत या सेवेला प्रारंभ झाला. या वेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर-पाटील, उपमहाव्यवस्थापक मनोज डॅनियल, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन आणि संचलन अधिकारी नारायण करडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींनी जाहीर करुनही क्षयमुक्त भारताचे लक्ष्य अजून दूरच या विस्तारित मार्गावरील पहिली सेवा सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे, तर शेवटची गाडी साडेसात वाजता असेल. या मार्गावर प्रत्येकी चौदा-चौदा फेऱ्या होणार आहेत. खराडी येथील पहिली गाडी सकाळी सव्वासात वाजता, तर रात्री पावणेनऊ वाजता शेवटची गाडी सुटणार आहे. रामवाडी मेट्रो स्थानक, वडगाव शेरी फाटा, विमाननगर काॅर्नर, पाचवा मैल, टाटा गार्डन, चंदननगर, खराडी बायपास, जनकबाब दर्गा, टाउन डाउन चौक, राघोजी चव्हाण चौक, वर्ल्ड ट्रेड सेंटर क्रमांक तीन आणि पाच, ईऑन गेट नंबर-२, इम्पेरिअल अल्फा काॅम्प्लेक्स, इंटरनॅशनल टेक पार्क असा या विस्तारीत सेवेचा मार्ग असेल. या विस्तारीत सेवेमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी, नोकरदार यांना लाभ होणार असून, या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.