पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातून आलेल्या प्रवासी तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अक्षय विजय सूर्यवंशी (वय २५, रा. काळेओढा, वाघोली), अब्दुल रेहमान अबुकर तामटगार (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – “सत्ता येते अन् जाते, पण…”, आंबेगावातून शरद पवारांचा वळसे-पाटलांना सूचक इशारा
हेही वाचा – पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच
तक्रारदार तरुण कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो कामानिमित्त पुण्यात आला होता. पुणे रेल्वे स्थानक परिसरात तो थांबला होता. त्यावेळी आरोपी सूर्यवंशी, तामटगार यांनी तरुणाला अडवले. त्याला धमकावून खिशातील साडेनऊ हजार रुपये काढून घेतले. दोघेजण पसार झाले. तरुणाने आरडाओरडा केला. पुणे स्टेशन परिसरात गस्त घालणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने तरुणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. पोलीस कर्मचाऱ्याने पाठलाग करून चोरट्यांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.