पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रेमीयुगुलाला ब्लॅकमेल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.संदीप वसंत शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये एक जोडपे मुक्कामाला आले होते. त्यांनी कागदपत्रे हॉटेलमध्ये जमा केली होती. शिंदे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता विभागात नियुक्तीस आहे. त्याने हॉटेलमधून जोडप्याची माहिती असलेली कागदपत्रे मागवून घेतली. त्यानंतर त्याने हाॅटेलमध्ये मैत्रीणीसोबत आलेल्या तरुणाच्याा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. शिंदे याचा त्रास वाढल्याने तरुणाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर शिंदे याची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत शिंदे दोषी आढळला.शिंदे याचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्यचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले.