गणेशोत्सव साजरा करताना त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देण्याचा प्रयत्न हा वर्षानुवर्षे करण्यात येत आहे. त्यात गैर काही नाही. मात्र आता समाजोपयोगी उपक्रम घेणे म्हणजे रक्तदान शिबिर असा पायंडा पडल्यामुळे रक्तदान शिबिर घेण्यासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त गाठण्याचा अट्टाहास करण्यात येत आहे. त्यासाठी रक्तदात्यांना मानाच्या गणपतींच्या ‘व्हीआयपी दर्शनाचे’ आमिष दाखवण्यात येत आहे.

नुकत्याच साजऱ्या झालेल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्या वेळी राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये सुमारे २५ दिवसांचा रक्तसाठा संकलित झाला. आता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरांचा घाट घालण्यात येत आहे. शहरी भागातील गणेशोत्सवातील शिबिरांमध्ये रक्तदान करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मानाच्या गणपतींचे व्हीआयपी दर्शन, आरतीचा मान, प्रमाणपत्र, भेटवस्तू अशा गोष्टींचे आमिषही दाखवले जात आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळेल आणि राज्यातील रक्तसंकलन वाढेल ही शक्यता असली तरी हे पात्र रक्तदाते पुढील तीन महिने रक्तदान करण्यासाठी अपात्र ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा : रात्री पावणे अकराला गडकरींनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन; आधी आरती केली अन् नंतर वारकऱ्यांसोबत केला हरी नामाचा गजर

शिबिरांचे आयोजन गरजेनुसारच

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले,की रक्तदात्यांना वस्तू किंवा पैसे स्वरूपात कोणताही मोबदला देण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करण्यात काही गैर नाही. ते कौतुक कोणत्या स्वरूपात असावे याबाबत सुवर्णमध्य काढला जाणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी सुमारे २५ दिवस पुरेल एवढ्या रक्ताचे संकलन झाले. मात्र, बहुतांश रक्तपेढ्यांकडील तो साठा आता संपत आलेला असणे शक्य आहे. त्यामुळे आपल्या रक्तसाठ्याचा अंदाज घेऊन रक्तपेढ्या पुढील रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. पुरुषांनी तीन, तर महिलांनी चार महिने अंतराने रक्तदान करणे अपेक्षित आहे. यापेक्षा कमी अंतराने प्रलोभनांना बळी पडून रक्तदान केल्यास त्याचा परिणाम रक्तदात्याच्या प्रकृतीवर होणे शक्य आहे. रक्तदाते आणि रुग्ण यांच्या हितासाठी रक्तदात्यांना योग्य माहिती रक्तदान करताना देणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तदानासाठी येणाऱ्यांचे समुपदेशन केले जाते, असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.