scorecardresearch

Premium

पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी

पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागल्यावर त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

BJP in Pune
पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी

सुजित तांबडे

पुणे : घराणेशाहीला थारा नसल्याची वल्गना करणाऱ्या भाजपला पुण्यात मात्र घराणेशाहीची लागण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने पुणे शहराची कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यामध्ये घराणेशाहीचा पगडा असल्याचे दिसून आले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण यांना स्थान देण्याबरोबरच नव्या चेहऱ्यांऐवजी मागील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपमध्ये आलेल्यांना संधी मिळाल्याने मूळचे भाजपचे एकनिष्ठ विरुद्ध अन्य पक्षांतून आलेले भाजपनिवासी यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.

Sharad Pawar in Delhi 3
“७० जणांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव दिलं, त्यापैकी…”, दिल्लीतील बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान
Rahul Narvekar Uddhav Thackeray
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात
Rajnish Seths
एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?
ajit pawar meeting in kolhapur
कोल्हापूरमध्ये अजित पवारांचे टीकेला उत्तर

पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागल्यावर त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुका विचारात घेता या कार्यकारिणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.  या कार्यकारिणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील समर्थकांचे प्राबल्य आहे. मात्र, कार्यकारिणी तयार करताना भाजपच्या एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी गेल्या महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांना संधी देण्यात आल्याने मूळनिवासी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

उपाध्यक्षपद दिलेले हरिदास चरवड हे मूळचे काँग्रेसचे आहेत. मागील निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झाले. माजी नगरसेवक शाम देशपांडे हे शिवसेनेमध्ये होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. रुपाली धावडे यांचे पती दिनेश धावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. चिटणीसपदी नेमणूक झालेले किरण बारटक्के हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. उमेश गायकवाड, अनिल टिंगरे आणि आनंद रिठे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपबाहेरून आलेल्यांना प्रमुख पदे मिळाल्याने निष्ठावंतांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे.

 पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा पुत्र करण मिसाळ यांना युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. उपाध्यक्षपदी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांना संधी देण्यात आली आहे. सरचिटणीस आणि भाजप महिला आघाडी शहर प्रमुखपदी नेमणूक केलेल्या वर्षां तापकीर या भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या कुटुंबातील आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The pune city executive by bjp it has been announced ysh

First published on: 26-09-2023 at 02:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×