रुग्णालयासाठी ३५० कोटींचे कर्ज कर भरा, आरोग्य सेवा विकत घ्या; पुणे महापालिकेचा अजब कारभार

येत्या काही दिवसांत रुग्णालयासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार; प्रस्तावाला राजकीय विरोध सुरू

रुग्णालयासाठी ३५० कोटींचे कर्ज कर भरा, आरोग्य सेवा विकत घ्या; पुणे महापालिकेचा अजब कारभार
(संग्रहीत)

पुण्यातील वारजे येथे प्रस्तावित ७०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासाठी महापालिका तब्बल ३५० कोटींचे कर्ज घेणार आहे. महापालिकेकडून रुग्णालयाची उभारणी होणार असून खासगी संस्थेला ते चालविण्यास देण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित असून ‘कर भरा आणि आरोग्य सेवा विकत घ्या’, असा अजब कारभार महापालिकेकडून केला जाणार आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत रुग्णालयासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून या प्रस्तावाला राजकीय विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

वारजे येथील या प्रस्तावित रुग्णालयाच्या उभारणीला फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली होती. वारजे येथील दहा हजार चौरस फुटांची जागा त्यासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘डिझाईन बिल्ट फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर’ या तत्त्वावर खासगी संस्था रुग्णालय उभारणार असून त्यासाठी नेदरलॅण्ड येथील राबो बँकेकडून दीड टक्के व्याजदराने महापालिका ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. रुग्णालय उभारल्यानंतर कर्जाचे हप्ते संबंधित खासगी संस्थेकडून भरले जाणार असून नागरिकांना या रुग्णालयात माफक दराने आरोग्य सुविधा मिळतील, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

७०० खाटांपैकी काही खाटांसाठी आरोग्य सेवा विकत घ्यावी लागणार –

रुग्णालयाच्या माध्यमातून ७०० खाटांपैकी काही खाटांसाठी आरोग्य सेवा विकत घ्यावी लागणार आहे. तर उर्वरीत खाटांसाठी खुल्या दराने आरोग्य सेवा विकत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड, रुग्णालयाची इमारत आणि साडेतीनशे कोटींच्या कर्जाची हमी खासगी कंपनीच्या घशात घातली जाणार आहे. खासगी कंपनीकडून कर्ज बुडविले जाऊ नये, यासाठी महापालिकेकडून रुग्णालयाचा विमा काढला जाणार आहे. त्यासाठी खासगी विमान कंपनीकडे विम्याच्या हप्ता महापालिका भरणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये रुग्णालय बंद पडले तर ९८ टक्के आणि संस्थेने काम थांबविले जतर ९५ टक्के नुकसानभरपाई विमा रकमेतून मिळणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा सर्वसामान्य पुणेकरांना कोणताही फायदा होणार नसल्याने या प्रस्तावा विरोध सुरू झाला आहे.

आम आदमी पक्षाचा विरोध –

“ कर भरा आणि खाजगी रुग्णालयांप्रमाणे पीपीपी रुग्णालयातून आरोग्यसेवा ही विकत घेण्याचा हा प्रकार आहे. त्याला आम आमदी पक्षाचा विरोध आहे. दर्जेदार आणि विनामूल्य आरोग्य सेवा पुरविणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.”, असे आपचे प्रदेश संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि राज्य प्रवक्ता डॅा. अभिजीत मोरे यांनी सांगितले.

बँकानेही अल्प दराने कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शविली –

फेब्रुवारी महिन्यात या प्रस्तावाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली. राज्य शासनाकडून रुग्णालयाचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे महापालिकेला कळविण्यात आले आहे. त्यानुसार नेदरलॅण्ड येथील बँकानेही अल्प दराने कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The pune municipal corporation will take a loan of 350 crores for the proposed 700 bed up to date hospital at warje pune print news msr

Next Story
द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्याबाबत रस्ते महामंडळाला अखेर जाग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी