पुणे : आंबिल ओढ्याचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरू नये, यासाठी सीमाभिंत कधी बांधणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात आला आहे.सीमाभिंत उभारण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारचा निधीच न आल्याने निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.
मंगळवारी शहरात जोरदार झालेल्या पावसामुळे पद्मावती येथे एका सोसायटीची सीमाभिंत कोसळण्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर आंबिल ओढा आणि इतर नाल्यांच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका सीमाभिंती उभारणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.पाच वर्षांपूवी शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला पूर आला होता. ओढ्याचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये घुसले होते.
यामध्ये सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या होत्या. महापालिकेच्या मुख्य सभेत यावर जोरदार चर्चा झाली होती. सोसायट्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात होती. महापालिकेला या ठिकाणी निधी खर्च करण्यासाठी मर्यादा येत असल्याने या परिसरातील सीमाभिंतींची कामे रखडली होती. या कामासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
आंबिल ओढ्याच्या कामासाठी राज्य सरकारने २०० कोटींचा निधी मंजूर केला होता. याच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदांमध्ये आमदाराच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळाली नाहीत. त्यामुळे हा निधी आला नाही.- अश्विनी कदम, माजी नगरसेविका, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष