“शिवसेनेतील अस्वस्थता हळूहळू बाहेर येत आहे. त्यांचे नेते पुढे येऊन तर कधी खासगीत याबाबद्दल बोलत आहेत. खऱ्या शिवसैनिकांना या पेक्षा जास्त उद्धव ठाकरे दाबून ठेऊ शकत नाहीत. त्यांना हिंदूत्वाकडे जावंच लागेल.” असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले. यावर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शिवसेनेमधील अस्वस्थता ही हळूहळू बाहेर पडू लागली आहे. कुठे तानाजी सावंत बोलले, रामदास कदम बोलले असं सुरू झालं आहे. काही खासगीत बोलतात काही उघडपणे बोलतात. या पेक्षा जास्त खऱ्या शिवसैनिकाला दाबून ठेवू शकत नाहीत शिवेसना, उद्धव ठाकरे. त्यामळे त्यांना हिंदुत्वाकडे जावचं लागले. त्यामुळे असा एखादा उघडपणे बोलतो.”

सर्वसामान्य माणसाची ही इच्छा आहे की… –

तसेच, “राजकारणात शक्यता एका क्षणात निर्माण होते. आता २०१४ ला युती झाली नाही नंतर सरकार झालं. रोज वाटायचं की सरकार पडेल कारण राजीनामे खिशातच होते ना? लिहिलेलं काहीच नव्हतं त्यावर पण केवळ खिशातून दाखवण्यापुरता होता राजीनामा. पाच वर्षे सरकार चाललं, त्यामुळे राजकारणात असं काही ठोस सांगता येत नाही. पण सर्वसामान्य माणसाची ही इच्छा आहे की, चला दोन भावांची भांडणं झाली परंतु केव्हा तरी ती भांडणं संपवून जुने संबंध निर्माण करावे लागतात. पण असं आम्ही म्हटलं रे म्हटलं की सामानामध्ये अग्रलेख येतो, की यांना असा ताण असल्यामुळे झोप लागत नाही. खूप शांत झोप लागते अगदी हात लावून उठवावं लागतं.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

नो लॉकडाउन कडक निर्बंध करा-

लॉकडाउन आणि करोनाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “कडक निर्बंधाबाबत आमची सहमती आहे. लॉकडाउन ला मात्र कोणीही तयार नाही. विदेशात ही नाही. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात. विद्यार्थी, व्यापारी, खेळाडू, उद्योग, एवढ्या मोठ्या वर्गाने दोन वर्षे सहन केलं. आता पुढील किती वर्षे सहन करणार. लग्न, सभा याबाबत कडक निर्बंध करा. पण, ऑफिस, शाळा, दुकान बंद करून काही होणार नाही. अर्थकारण रुळावर येत आहे. याचा विचार करायला हवा. नो लॉकडाउन कडक निर्बंध करा.”

याचबरोबर पुढे ते म्हणाले की, “जनजीवन ठप्प करून चालणार नाही. नागरिक वेडे होतील. कमी संख्यांचे कार्यक्रम नियम पाळून करायला हवेत. दरम्यान, कोविडच्या बैठकीत सर्व अरेरावी चाललेली आहे. मी ही महाराष्ट्राचा मंत्री होतो. बैठकीतील सूचनांना वाटाणा आणि अक्षदा लावणार असाल, तर आम्हाला फॉरमिलिटी नकोत.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The real shiv sainiks cannot be suppressed by uddhav thackeray more than this chandrakant patil msr 87 kjp
First published on: 05-01-2022 at 15:46 IST