scorecardresearch

MPSC विद्यार्थ्यांची भूमिका तीच माझी आणि सरकार ची; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MPSC विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे. तीच माझी आणि सरकारची आहे. MPSC आयोगाला मी दोन वेळा सांगितलं आहे.

eknath shinde

MPSC विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे. तीच माझी आणि सरकारची आहे. MPSC आयोगाला मी दोन वेळा सांगितलं आहे. त्या विध्यार्थ्यांना ज्या पद्धतीने परीक्षा पाहिजे, तशीच परीक्षा होणार. त्यांची मागणी पूर्ण करणार. याचं श्रेय कोणाला घ्यायचं ते घेऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अस म्हणत त्यांनी अप्रत्येक्षपणे शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवड च्या राहटणीत बोलत होते. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत लक्ष्मण जगतापांनी मतदारसंघाला कुटुंब समजलं. त्या कामाची पोचपावती मिळाली. रोड शो ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अश्विनी ताई लक्ष्मण भाऊंनी केलेल्या सेवेची ही समोरची जनता पोचपावती आहे. दिवंगत लक्ष्मण जगतापांची रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती. तशी आपली परंपरा आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरेंनी तसं मत मांडलं. आम्ही त्या विनंतीस मान दिला. पण दुर्दैवाने आज मात्र विरोधकांनी या पोटनिवडणुकीत तो प्रतिसाद दिला नाही. पण मी रोड शो मध्ये मतदारांचा कौल पाहिला. त्यातून तुम्ही मताधिक्याने निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे.

पुढे ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असल्यानं माझ्याकडे सगळे रिपोर्ट येतात. देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना ही सगळे रिपोर्ट कळतात. त्यात रिपोर्ट मध्ये लक्ष्मण भाऊंच काम बोलतंय. त्यातूनच तुमचा विजय निश्चित असल्याचं दिसतोय. दिवंगत लक्ष्मण जगताप दुर्धर आजारी असताना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला रुग्णवाहिकेतून पोहचले. आपला उमेदवार निवडून येणार याची कल्पना असताना ही आपलं मत वाया जाऊ नये, ही त्यांची तळमळ होती. हे पाहून त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर वाढला. मी मुख्यमंत्री होण्यात लक्ष्मण जगतापांचा ही मोलाचा वाटा आहे.

पुढे ते म्हणाले की, २०१९ मध्ये भाजप शिवसेना युती होती. आपण सत्तेत आलोच होतो. पण अघटित घडलं, पण खुर्चीचा मोह अन नको ते घडलं. पण त्या सत्तेत नैराश्य पसरलं होतं. जनतेच्या मनात चूक झाल्याची भावना होती. म्हणून मोठा कार्यक्रम करावा लागला. तो तुमच्या समोर आहे. पुढे ते म्हणाले की, दिवसातले 24 तास ही कामाला कमी पडतायेत. आता मी इथून संभाजीनगर अन तिथून परत पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला येतोय. असं काम मी मुख्यमंत्री झाल्यापासून सुरु आहे. शास्ती कर माफ करण्याचा निर्णय आम्ही विधानभवनात घेतला. याचा जीआर मी लवकरच काढणार आहे. अनधिकृत बांधकामासाठी तुम्ही मुंबई अन नागपूर पर्यंत मोर्चे काढले. पण आता तसे मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही. ठाण्याच्या धर्तीवर इथली अनधिकृत बांधकाम नियमित केली जातील. साडे बारा टक्क्यांचा विषय, निगडी पर्यंत मेट्रोचा विस्तार, पाण्याची समस्या ही संपवणार.

पुढे ते म्हणलेकी, लक्ष्मण भाऊंनी आजवर केलेली कामं तुम्ही पाहताय. यापुढं उरलेला विकास अश्विनी ताई करतील. ताई तुम्ही घाबरू नका, तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे. मी जे बोलतो ते करतो, हे तुम्ही गेल्या नऊ महिन्यात पाहताय. आचारसंहिता आहे, काही नियम आहेत. ते आपण पाळायला हवेत. अशातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला स्थगिती न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मेरिट वर हा निर्णय घेण्यात आलाय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 23:39 IST
ताज्या बातम्या