कात्रज भागात ज्येष्ठ महिलेचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्याचा माग काढून पकडण्यात आले. विशाल कामराज कांबळे (वय ३०, रा. पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा- विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; एकास अटक

तक्रारदार ज्येष्ठ महिला कात्रज भागातील नॅन्सी लेक होम सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा कांबळे ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाला. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी चित्रीकरण पडताळले.

हेही वाचा- बारामती- मोरगाव रस्त्यावर अपघातात तिघांचा मृत्यू

कांबळेने ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, नरेंद्र महांगरे, शैलेंद्र साठे, रवींद्र चिप्पा, सचिन गाडे आदींनी ही कारवाई केली.