वाहतूक पोलिसांचा हिसका

वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चार दिवसांत ९२ जणांच्या पारपत्राला अटकाव; दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची माहिती जमा

वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्हय़ांची माहिती पारपत्र कार्यालयाला देण्याची कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पारपत्र कार्यालयाकडे पारपत्र मिळवण्यासाठी ज्यांनी अर्ज केले होते त्यातील ९२ जणांवर वाहतूक पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्हय़ांची माहिती पारपत्र कार्यालयाला पुरविण्यात आल्यानंतर त्यांना आता लगेचच पारपत्र मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चार दिवसांत वाहतूक पोलिसांनी ९२ जणांच्या पारपत्राला अटकाव घातला आहे.

वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. अशा वाहनचालकांनी दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करावी लागते.

या बाबत त्यांना मोबाइलवर संदेश पाठविण्यात येतो. काही जण वाहतूक नियमभंगाच्या दंडाची रक्कम भरत नाहीत. दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनचालकांची माहिती पारपत्र, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभागाला देण्यात  येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस उपायुक्त सातपुते यांनी दिला होता. जे वाहनचालक दंड भरत नाहीत तसेच टाळाटाळ करतात, अशांनी पुण्यातील पारपत्र कार्यालयात पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पारपत्र कार्यालयात अर्ज आल्यानंतर अशी प्रकरणे पोलिसांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९२ जणांची यादी तातडीने पारपत्र कार्यालयाकडे पाठविली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ९२ जणांच्या पारपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला तूर्त अटकाव घालण्यात आला आहे.

‘तातडीने दंडाची रक्कम भरा’

वाहतुकीच्या नियमांचे शक्यतो पालन करावे. नियमभंग करणे हे फक्त दंडाच्या रकमेपुरते मर्यादित राहिले नाही. ज्यांच्यावर वाहतुकीच्या नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांनी तातडीने दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांना भविष्यात पारपत्र तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार आहे. वाहतूक पोलिसांचे ई-चलन प्रलंबित आहे की नाही हे पाहण्यासाठी पुणेट्रॅफिकॉप.नेट या संकेतस्थळावर खात्री करावी.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अडथळे

दखलपात्र, मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास एखाद्या व्यक्तीने पारपत्र मिळवण्याबाबत अर्ज सादर केल्यास त्या बाबतची विचारणा पारपत्र कार्यालयाकडून पोलिसांकडे होते. पोलिसांकडून पडताळणी केल्यानंतर (व्हेरिफिकेशन) याबाबतचा अहवाल पारपत्र कार्यालयाकडे पाठविण्यास येतो. गुन्हा दाखल झाल्यास पारपत्र मिळत नाही. जोपर्यंत दाखल गुन्हय़ात निदरेष मुक्तता होत नाही तोपर्यंत पारपत्र मिळू शकत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The traffic police jerk