पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे. पुढील दहा वर्षांसाठी हा स्वायत्त दर्जा असून, स्वायत्ततेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी ही माहिती दिली. १९१३मध्ये खडकी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर १९८३ साली तत्कालीन संस्था अध्यक्ष ॲड. एस के जैन, चिटणीस ॲड. चंद्रकांत छाजेड यांच्या प्रयत्नाने टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध असलेल्या या महाविद्यालयाने माणिक महोत्सव साजरा केला आहे. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याने आता शैक्षणिक स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्या अंतर्गत विदा विज्ञान, इंटेरिअर डिझायनिंग, सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, ॲनिमेशन, सिव्हिल सर्व्हिसेस, नाट्यशास्त्र असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले. संस्थेचे सचिव आनंद छाजेड, उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. डी. एम. मुपडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण डामसे या वेळी उपस्थित होते.