पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना परवानगी देणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी प्रत्यक्ष उपस्थितीतील (फिजिकल) अभ्यासक्रमांना, दोन ऑनलाइन, दोन मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.
यूजीसीने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. एकाच वेळी दोन पदवी, पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय यूजीसीने २०२२मध्ये घेतला. त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वेही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांना ३ एप्रिल रोजी झालेल्या यूजीसीच्या ५८९व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात सध्याच्या शैक्षणिक लवचिकतेचा विस्तार करण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना दोन पूर्ण वेळ शैक्षणिक अभ्यासक्रम प्रत्यक्ष उपस्थित करता येणार आहेत. केवळ त्या अभ्यासक्रमांच्या वेळा स्वतंत्र असणे आवश्यक आहे. तसेच, एखादा विद्यार्थी एक पूर्ण वेळ प्रत्यक्ष अभ्यासक्रमाबरोबर मुक्त आणि दूरस्थ पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने दुसरा अभ्यासक्रम करू शकतो. त्याशिवाय, यूजीसी, वैधानिक संस्था, केंद्र सरकारची मान्यता असलेले दोन मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रम किंवा दोन ऑनलाइन अभ्यासक्रमही करण्यास मुभा देण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे पीएच.डी. अभ्यासक्रमांना लागू होणार नाहीत. विद्यापीठे आणि संलग्न संस्थांनी त्यांच्या अधिकार मंडळांमार्फत नियम अंमलात आणण्याचे निर्देशही परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
पूर्वीच्या अभ्यासक्रमांनाही वैधता
पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या अधिसूचनेपूर्वी एकाच वेळी पूर्ण केलेले पदवी अभ्यासक्रम आता वैध मानले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, संबंधित अभ्यासक्रम यूजीसीच्या फर्स्ट डिग्री आणि मास्टर डिग्री नियमांनुसार, संबंधित अधिकार मंडळ, दूरशिक्षण संस्थांच्या नियमांनुसार पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या बदलामुळे पूर्वी एकाचवेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या वैधतेबाबतचा संभ्रम संपुष्टात आला आहे.