खड्ड्यात साठलेले पाणी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर उडाल्याने तिने मोटारचालकास मारहाण केल्याची घटना मुंढव्यातील एबीसी फार्म रस्त्यावर घडली. दुचाकीस्वार महिलेने मोटारचालकाच्या डोक्यात दगड मारल्याने तो जखमी झाला. या प्रकरणी दुचाकीस्वार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी रेणुका नितीन पुडे (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोटारचालक निशांत भगीरथ मल्होत्रा (वय ४५, रा. कोरेगाव पार्क) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक निशांत मल्होत्रा मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून एबीसी फार्म रस्त्याने कोरेगाव पार्ककडे जात होते. हायस्पिरीट हॅाटेलजवळ सिग्नलपाशी मोटार खड्ड्यातून गेली. खड्ड्यातील पाणी दुचाकीस्वार रेणुकाच्या अंगावर उडाल्याने ती चिडली. तिने मल्होत्रा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मल्होत्रा यांनी मोटार बाजूला नेऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने रस्त्यात पडलेला दगड मल्होत्रा यांच्या डोक्यात मारला. मल्होत्रा यांच्या डोक्याला जखम झाली. मल्होत्रा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman beat up the motorist as the water in the pit blew up pune print news amy
First published on: 17-08-2022 at 09:46 IST