पिंपरी-चिंचवड : भोसरीत दोन घटनांमध्ये तीन जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत किरकोळ घरगुती भांडणातून तरुण विवाहित दाम्पत्याने तर दुसऱ्या घटनेत साखरपुडा मोडल्याने व्यवसायाने नर्स असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार. गव्हाणेवस्ती येथे महिला वसतीगृहात राहणाऱ्या भारती ठाकरे (वय ३१, मुळ गाव अमरावती) नामक तरुणीने साखरपुडा मोडल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. भारती एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. भारतीचा साखरपुडा एक वर्षांपूर्वी झाला होता. तो काही दिवसापूर्वी मोडला. याच नैराश्यातून तिने दोन दिवसांपूर्वी वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती एकटीच खोलीत राहत असल्याने तीने आत्महत्या केल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. भारतीचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत हरिहर परमानंद (वय २६) आणि पिंकी प्रजापती (वय १८) असे गुळवेवस्ती इथे राहणाऱ्या आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांचा सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मुळचे मध्यप्रदेशचे असणारे हे दाम्पत्य कामधंद्यानिमित्त भोसरी येथे राहत होते. गुरुवारी दुपारी किरकोळ घरगुती कारणावरुन या पती-पत्नीत भांडण झाले. त्यानंतर पिंकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी आल्यानंतर पती हरिहरने पत्नीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पिंकीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहीली होती. यात पतीला उद्देशून ‘तू आला नाहीस म्हणून मी रागावले आहे, मी आत्महत्या करत असून मला माफ कर’ असा मजकूर लिहीला आहे. या सुसाईड नोटमध्ये लिहीला आहे. या घटनेची माहिती घराच्या खाली राहणाऱ्या महिलेने पती हरिहर परमानंद यांना फोनवरुन दिली. त्यानंतर हरिहर तातडीने घरी आले आणि घराचा दरवाजा बंद करुन पत्नीचा वियोग सहन न झाल्याने स्वतः दुसऱ्या एका ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिहर परमानंद हा एका कंपनीत काम करत होता. या नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांची माहिती पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.