scorecardresearch

पत्नीच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कामगाराने सशस्त्र हल्ला करत दूध डेअरी चालकास लुटले

या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे

crime
(फाईल फोटो)

पत्नीच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका कामगाराने दूध डेअरी चालकावर शस्त्राने हल्ला केला. एवढच नाही, तर साथीदारांच्या मदतीने त्याने डेअरी चालकाकडील रोकडही लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणात आकाश पवार (वय २५, रा. हडपसर), मयूर कांबळे (वय २१, हडपसर), अविनाश सूर्यवंशी (वय २२, रा. हडपसर), आदित्य कोरडे (वय २०, रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. पांडुरंग सदाशिव कुरणे (रा. गणपती माथा मंदिर, वारजे माळवाडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती.

कुरणे यांचा डेअरी व्यवसाय आहे. मागील महिन्यात ते उंड्री येथून जात होते. त्या वेळी मोकळ्या जागेत त्यांना अडवून त्यांच्याकडील दहा हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा मुद्देमाल लुटण्यात आला होता. कुरणे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

आरोपी आकाश पवार हा कुरणे यांच्या डेअरीत कामाला होता. त्याने पत्नीच्या उपचारासाठी आगाऊ पगार मागितला होता, अशी माहिती पोलीस कर्मचारी निलेश देसाई यांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या चौघांना मंतरवाडी परिसरात सापळा लावून पकडले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील निरीक्षक जगन्नाथ जानकर, गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील पाटील, निलेश देसाई, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, किशोर वळे, सतीश चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The worker carried out an armed attack and looted the milk dairy owner pune print news msr

ताज्या बातम्या