करोना प्रादुर्भावामुळे नाटय़गृहांच्या उत्पन्नाची टाळेबंदी

करोना प्रादुर्भावामुळे शहरातील नाटय़गृहांच्या उत्पन्नाची टाळेबंदी झाली आहे.

१६ महिन्यांपैकी वर्षभर नाटय़गृहे बंद; भाडय़ापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे अपेक्षित उद्दिष्टही असाध्य

पुणे : करोना प्रादुर्भावामुळे शहरातील नाटय़गृहांच्या उत्पन्नाची टाळेबंदी झाली आहे. गेल्या १६ महिन्यांपैकी वर्षभर नाटय़गृहे बंद असल्यामुळे महापालिकेच्या नाटय़गृहांकडून भाडय़ापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता आले नाही. सर्व नाटय़गृहांचे मिळून पाच कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मार्चअखेरीपर्यंत ४४ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्चच्या मध्यापासूनच नाटय़गृहांतील प्रेक्षकांची संख्या कमी होऊ लागली होती. करोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केली. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे, मॉल, जलतरण तलाव, केशकर्तनालये या सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

त्याचा परिणाम शहरातील नाटय़गृहांच्या उत्पन्नावर झाला. नाटय़गृहातील प्रयोगांच्या भाडे आकारणीनुसार पाच कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नाटय़गृहे बंद असल्यामुळे उत्पन्नाची टाळेबंदी झाली असल्याची माहिती नाटय़गृहाचे मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी दिली.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने ५० टक्के प्रेक्षक क्षमतेमध्ये नाटय़गृहे सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष नाटय़गृहे सुरू होण्यासाठी डिसेंबपर्यंत वाट पाहावी लागली. नाटकांच्या प्रेक्षक संख्येत घट झाली. प्रशांत दामले यांच्या एका नाटय़प्रयोगाला बाल्कनी उघडावी लागली होती.

तर, लावण्यांच्या कार्यक्रमांना जेमतेम पन्नास प्रेक्षक असायचे. करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे एक मार्चपासून पुन्हा नाटय़गृहे बंद ठेवण्याचे आदेश आले. तेव्हापासून नाटय़गृहांच्या उत्पन्नाला खीळ बसली आहे, याकडे मते यांनी लक्ष वेधले.

करोना प्रादुर्भावामुळे शहरातील नाटय़गृहे बंद असल्याचा फटका उत्पन्नाला बसला आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे नाटकांचे मोजकेच प्रयोग झाले. तर गणेश कला क्रीडा मंच येथील भाडे तुलनेने अधिक असल्याने हे उत्पन्न झाल्याचे दिसत आहे.

– सुनील मते, मुख्य व्यवस्थापक, महापालिका रंगमंदिर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theatrical revenue due to corona outbreak pune ssh

ताज्या बातम्या