रोहित्रातील तांब्याच्या तारा, शेतीपंपांची चोरी; शेतकरी हवालदिल

ग्रामीण भागातील महावितरणच्या रोहित्रांची (ट्रान्सफार्मर) तोडफोड करून अंतर्गत भागातील तांब्याच्या तारा तसेच ऑईल चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत.

पुणे : ग्रामीण भागातील महावितरणच्या रोहित्रांची (ट्रान्सफार्मर) तोडफोड करून अंतर्गत भागातील तांब्याच्या तारा तसेच ऑईल चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. रोहित्रातील बिघाड, त्यांब्याच्या तारांची चोरी यामुळे ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या चोऱ्यांपाठोपाठ ग्रामीण भागात नदीकाठी बसविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारीही चोरीस जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती, शिरूर भागात महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा तसेच ऑईल चोरीला गेल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागल्या आहेत. रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरीस गेल्यानंतर वीजपुरवठा खंडित होतो. मध्यंतरी लोणी काळभोर भागातून चोरटय़ांनी रोहित्रच चोरून नेले होते. रोहित्र चोरीमुळे वीजपुरवठा खंडित होतो. रोहित्राच्या दुरुस्तीस किमान आठवडय़ाचा कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येतात. पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागते. रोहित्र चोरीमुळे महावितरणचे नुकसान तर होतेच शिवाय शेतकऱ्यांनाही फटका बसतो, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. 

ग्रामीण भागातून रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरून त्याची विक्री भंगार व्यावसायिकांना केली जाते. भंगार व्यावसायिक आणि चोरटय़ांची हातमिळवणी असते. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरीस जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठय़ाच्या मोटारी चोरून नेल्या जातात, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

२५ ते ३० हजारांची कमाई

 महावितरणच्या रोहित्रात किमान ५० ते ६० किलो तांब्याच्या तारा तसेच ऑईल असते. भंगार व्यावसायिक एक किलो तांब्याची तार ३०० ते ५०० रुपये दराने चोरटय़ांकडून खरेदी करतात. रोहित्रातील तारा चोरणाऱ्या चोरटय़ांना काही मिनिटांत २५ ते ३० हजार रुपये मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील भंगार माल खरेदी करणारे व्यावसायिक तसेच चोरटय़ांवर पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरीचे प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

कुंपणच शेत खाते

मध्यंतरी यवत भागातील पारगाव परिसरात रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. चोरटय़ांनी रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे १२ गुन्हे उघडकीस आले. याप्रकरणात अटक करण्यात आलेला एक चोरटा महावितरणमधील कंत्राटी कामगार असल्याचे तपासात उघडकीस आले होते. 

वीजपुरवठय़ाचे वेळापत्रक पाहून चोरी

ग्रामीण भागातील वीजपुरवठय़ाचे वेळापत्रक पाहून चोरटे रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरतात.  बांधापासून काही अंतरावर असलेल्या रोहित्रांची पाहणी चोरटे करतात. शेतातील वर्दळ सायंकाळी कमी झाल्यानंतर चोरटे शिडीचा वापर करून रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरतात. चोरटय़ांना वीजपुरवठा कसा बंद करायाचा, याची तांत्रिक माहिती असते. वीज पुरवठय़ाचे वेळापत्रक पाहून चोरटे रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाच महिन्यांपूर्वी आमच्या भागातील रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या. त्यानंतर पंधरा ते वीस दिवस वीजपुरवठा खंडित होता. या कालावधीत आम्ही जनित्राची व्यवस्था करून पिकांना पाणी दिले. ग्रामीण भागात महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करून तारा चोरल्या जातात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडचण येते.

भाऊसाहेब शेवाळे, शेतकरी, वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Theft agricultural pumps farmers heartbroken ysh

ताज्या बातम्या