पुणे : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी पाच लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली.याबाबत सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात एका प्रसिद्ध सराफी पेढीचे दालन आहे. सराफी पेढीत २२ जून रोजी दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता.

सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला महिलांनी सोन्याच्या बांगड्या दाखविण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्याने त्यांना बांगड्या दाखविल्या. प्लास्टिक ट्रेमधील बांगड्या पाहण्याचा बहाणा महिलांनी केला. त्यानंतर कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी पाच लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्या. बांगड्या चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत. सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.