पुण्यातील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी अध्यासन केंद्राचं कुलूप तोडून ध्वनीवर्धक यंत्रणा आणि मोबाइल संच असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल लांबवला आहे. चोरीची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर परीमल कुलकर्णी (वय ४०, रा. सनशाईन सोसायटी, फुरसुंगी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनं दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अध्यासन केंद्रातील खोल्यांचे कुलूप तोडून ५५ हजार रुपये किंमतीची ध्वनीवर्धक यंत्रणा (मिक्सर) आणि मोबाइल संच असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर करत आहेत.