पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एके काळी ओळखले जात होते. त्यानंतर आता मोटारसायकलींचे युग आले. पण त्यापूर्वी सायकल विकत घेणे हे सामान्यांनादेखील परवडायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकली बाजारात आल्याने सायकल विकत घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले.. सायकलींना आलेली किंमत हेरून आता त्यांच्यावरही चोरांची वक्रदृष्टी पडली आहे. किमती पाहून थक्क व्हायला लावणाऱ्या अशाच काही रेसर सायकलींची चोरी खडक पोलिसांनी उघडकीस आणली आहे. सायकल चोरीचा ‘छंद’ जोपासणाऱ्या या चोरटय़ाकडून २६ रेसर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
राजू मल्लया कोटा (वय ३८ रा. इनामके मळा, लोहियानगर) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. राजू हा सराईत चोरटा आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. बाजारात रेसर सायकली मोठय़ा किमतींना मिळतात. काही सायकली दहा हजारांपासून ४० हजारांपर्यंत आहे. जुन्या सायकलींनाही चांगली किंमत मिळते. ही बाब राजू याच्या लक्षात आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो महागडय़ा सायकल चोरीच्या ‘उद्योगा’त उतरला होता. त्याने मध्यवस्तीतून महागडय़ा रेसर सायकली चोरण्यास सुरुवात केली. बुधवारी पोलीस हवालदार विजय कांबळे हे लोहियानगर परिसरातून गस्त घालत होते. त्यावेळी राजू याने त्याच्या घराजवळ रेसर सायकल ठेवल्याची माहिती हवालदार कांबळे यांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला आणि पोलिसांना महागडय़ा सायकलींचा खजीनाच मिळाला.
पोलिसांनी राजूला पकडले. त्याच्या घराच्या परिसरातून हिरो, हक्र्युलस, स्नॅचनेल कंपनीच्या २६ रेसर आणि साध्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. रेसर सायकल विकल्यास चांगली किंमत मिळते. त्यामुळे आपण रेसर सायकली चोरल्याची कबुली राजू याने पोलिसांना दिली आहे.पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सुरेश सोनावणे, विजय कांबळे, राजेंद्र शिंदे, दीपक धाबेकर, अनिकेत बाबर, इम्रान नदाफ, कल्पेश बाबर आदींनी ही कामगिरी केली.
तक्रारदारांनी संपर्क साधावा
राजू कोटा या चोरटय़ाने व्यसनासाठी रेसर सायकली चोरल्या. सोसायटीच्या आवारात लावलेल्या रेसर सायकली चोरून तो पसार व्हायचा. गंज पेठेत राहणाऱ्या अनिता संतोष गुजराथी यांच्या मुलाची सायकल त्याने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप ज्यांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत. असे तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत. तक्रारदारांनी खडक पोलीस ठाण्यात (दूरध्वनी क्र. ०२०- २४४५२०९५ किंवा मोबाईल क्र. ९३७३९४५०६६) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.