पुणे : शहरात नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे डासोत्पत्ती वाढली असून, साथरोगांचा धोका निर्माण झाला आहे. या निमित्ताने महापालिकेचे दोन विभाग समोरासमोर आले आहेत. वारंवार पत्र पाठवूनही पर्यावरण विभागाकडून जलपर्णी काढली जात नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यावर जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याचे पर्यावरण विभागाने म्हटले आहे.
शहरात ४५ किलोमीटरचे नदीपात्र आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी असलेली काही ठिकाणे आहेत. त्यात नऱ्हे, धायरी, राजाराम पूल, कोथरूड, ओंकारेश्वर कल्याणीनगर, संगम पूल, येरवडा, मांजरी, मुंढवा या भागात नदीपात्रामध्ये जलपर्णी अधिक दिसून येते. सर्वसाधारणपणे हिवाळा आणि उन्हाळ्यात जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात दर वर्षी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या परिसरात डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथरोगांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात हे कीटकजन्य आजार वाढत असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असते. मात्र सध्या शहरात नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी फोफावल्याचे दिसत आहे.
प्रदूषित पाणी कारणीभूत
शहराच्या विविध भागांत नाल्यातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदी व तलावामध्ये मिसळते. अशा पाण्यावर जलपर्णीची वाढ जास्त होते. पाण्यातील प्रदूषित घटकांवर जलपर्णी वाढत असल्याने सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालविले जातात. या प्रकल्पांची क्षमता पुरेशी नसल्याने जायका अंतर्गत नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. तोपर्यंत जलपर्णीची वाढ थांबविण्यासाठी ती यांत्रिकी पद्धतीने काढण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाने दिली.
डासोत्पत्तीस पोषक स्थिती
जलपर्णी या डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक परिस्थिती निर्माण करतात. डासांना उत्पत्तीसाठी योग्य स्थान मिळाल्याने त्यांची पैदास गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. यामुळे नागरिकांकडून वारंवार आरोग्य विभागाकडून डासांच्या तक्रारी करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने ही जलपर्णी काढून टाकण्यासाठी पर्यावरण विभागाला पत्रे लिहिली आहेत. त्यावर पर्यावरण विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे, असा दावा सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केला.
जलपर्णी काढण्याचे काम सुरू
पर्यावरण विभागाने नदीपात्रांसह तलावातील जलपर्णी काढण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी २५ लाखांचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात येते. जेसीबी, पोकलेन, स्पायडर यंत्र आणि बोटीच्या माध्यमातून जलपर्णी काढण्यात येत आहे. याचबरोबर ठेकेदाराच्या कामगारांकरवी हे काम सुरू आहे, असे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी सांगितले.
साथरोगांमध्ये वाढ
यंदा शहरात डेंग्यूचे १२१ संशयित रुग्ण आढळले असून, त्यांपैकी ८ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. त्याच वेळी चिकुनगुन्याचेही ८ रुग्ण आढळले आहे. शहरात हिवतापाचे १८ रुग्ण आढळले आहेत. या वर्षात अद्यापपर्यंत या कीटकजन्य आजारांमुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी आरोग्य विभागाने १८ घरमालकांसह कार्यालये आणि महाविद्यालयांना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून ५९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मे महिन्यातील रुग्णसंख्या
डेंग्यू संशयित – १४
डेंग्यू निदान – २
हिवताप – ४