शहरात गोवर आजाराचा एकही रुग्ण महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळून आलेला नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संशयितांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने तपासणीसाठी दिलेले दीडशे अहवाल नकारात्मक आले असून येत्या काही दिवसांत साठ अहवाल महापालिकेला मिळणार आहेत. मात्र सर्वेक्षणातील प्राथमिक अंदाजानुसार शहरात गोवर आजाराचा संशयित रुग्ण आढळून येणार नाही, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>राज्यपालांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; काळे झेंडे दाखविण्याची तयारी, शहराध्यक्षांना पोलिसांची नोटीस

राज्यात भिवंडी, मुंबई आणि मालेगांव येथे गोवर आजाराची साथ आढळून आली आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. बालकांना ताप, सर्दी, खोकला येणे, घशात दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

हेही वाचा >>>पुणे: दुचाकी टॅक्सी, ‘आरटीओ’त न्यायालयीन वाद

महापालिका रुग्णालयांतर्गत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या लोकसंख्येच्या आधारे शून्य ते दोन वर्षे आणि दोन ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. संशयित रुग्णाला रुग्णालयामध्ये विलगीकरणात किंवा सौम्य असेल तर घरामध्येच विलगीकरणामध्ये ठेवून व्हिटॅमिन ए आणि लस घेतली नसेल तर लस देण्यात येते. तसेच ताप असेल तर तापावरील औषध देण्यात येत आहे. दाट लोकवस्तीच्या भागात महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. संशयित बालकांची तपासणी करण्यात येत आहे. नमुने गोळा करून हाफकिन इन्स्टिट्यूटला पाठविले जातात. दीडशे नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, तर साठ अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डाॅ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू

गोवर रोखण्यासाठी त्वरित गोवर रुबेला लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रसूतिगृहात सध्या बालकांचे नियमित लसीकरण केले जात आहे. महापालिकेच्या दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोन वेळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकदा लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे बांधकामांच्या ठिकाणी, जोखीमग्रस्त आणि अतिजोखीमग्रस्त ठिकाणी आणि रस्त्यांवरील बालकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनाथाश्रम, धार्मिक ठिकाणांमध्ये किती बालके आहेत, याची माहिती सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी लसीकरण वाढविण्याला आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. तसेच आता महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयातही विनामूल्य लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.