रूग्ण व डॉक्टरांमध्ये सुसंवाद हवा, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, असे मत ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार  यांनी  भोसरीत बोलताना व्यक्त केले. समान काम- समान वेतन, करोना काळात काम केलेल्यांना वैद्यकीय सेवेत कायम करावे, यासह विविध मागण्यांकडे  आरोग्यमंत्री राजेश टोपे  लक्ष  घालतील.  केंद्रीय  स्तरावरील  प्रश्नांसाठी  मी  पाठपुरावा  करेन,  अशी  ग्वाही  पवारांनी या वेळी दिली.

‘निमा’ संघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार किरण लहामते यांच्यासह डॉ. सुहास जाधव, डॉ. आशुतोष कुलकर्णी, सत्यजीत पाटील, डॉ. शैलेश निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, निमा ही वैद्यकीय क्षेत्रातील देशातील मोठी संघटना आहे. जाणत्यांची साथ लाभलेल्या या संघटनेचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. राज्यभरात वाड्यावस्त्यांवर जाऊन संघटनेने काम केले. करोनाचे संकट असो की, नैसर्गिक आपत्ती असो कोणतीही अपेक्षा न करता  निमा मदतीसाठी  धावून गेल्याचे आपण पाहिले. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी काम केले व अनेकांचे जीव वाचवले. त्याचवेळी, ही  वैद्यकीय  सेवा देताना अनेक डॉक्टरांनाही प्राण गमवावे लागले.

बऱ्याच वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना प्रचलित  होती.  घरोबा  असणाऱ्या  अशा  डॉक्टरांवर  संपूर्ण  कुटुंबाचा  विश्वास  असे. रूग्णांना त्यांचा  लगेचच  गुण येत असे. रूग्णाची तपासणी करताच निम्मा आजार बरा होत होता. जनतेच्या मनातही त्यांना अतिशय आदराचे स्थान होते,  याकडे पवारांनी लक्ष वेधले.