पिंपरी : मुलीच्या प्रेमप्रकरणाला आईचा विरोध असल्याने आईच्या प्रियकराने मुलीच्या १९ वर्षीय प्रियकराचा चाकू आणि चॉपरने वार करून खून केला. या हल्ल्यात आणखी एक तरूण गंभीर जखमी झाला. ही घटना थेरगाव येथे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

यामध्ये १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मित्र जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून  त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मृत तरुणाच्या वडिलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काळेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी याबाबत माहिती दिली. मृत तरुण आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला त्या तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. एक आरोपी हा तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याने तरुणाला या प्रेमसंबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास थेरगावमध्ये आरोपींनी तरुणाला गाठले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपींनी जवळ असलेल्या चाकू आणि चॉपरने तरुणाच्या हातावर, पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावरही आरोपींनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. यात प्रियकर तरुणाचा मृत्यु झाला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

कॅफे’मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

रावेत येथील एका कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने घटनेच्या २० दिवसानंतर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली असता या प्रकरणाला वाचा फुटली आहे. ही घटना १८ एप्रिल रोजी दुपारी रावेत मधील एका कॅफे मध्ये घडली.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने पीडित अल्पवयीन मुलीला रावेत येथील एका कॅफे मध्ये नेले. तिथल्या एका खोलीत नेऊन त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ७ मे रोजी पोलीस ठाण्यात येऊन याबाबत माहिती दिली असता भारतीय न्याय संहिता, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने आठ लाखांची फसवणूक

म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख २२ हजार रुपये घेत फ्लॅट न देता फसवणूक केल्याचा प्रकार मासुळकर कॉलनी पिंपरी येथे उघडकीस आला. हा प्रकार २९ डिसेंबर २०२२ ते ७ मे २०२६ या कालावधीत घडला.

याप्रकरणी एका महिलेने  संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेला म्हाडाच्या स्कीममध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी कडून वेळोवेळी आठ लाख २२ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील म्हाडाचा फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.