पुणे : जुनी वाहने खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाकडे बतावणी करुन चोरटा दुचाकीसह पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत व्यावसायिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचा जु्नी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात व्यावसायिकाचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चोरटा दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानाात आला. दुचाकी खरेदी करण्याची बतावणी त्याने व्यावसायिकाकडे केली. एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार त्याने केला. त्यानंतर दुचाकीवरु रपेट मारुन येतो, असे सांगून तो दुचाकी घेऊन पसार झाला. दुचाकी घेऊन चोरटा पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
पाेलिसांकडून कारवाईची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मुंढवा भागात राहायला आहे. सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची बतावणी सायबर चोरट्याने त्यांच्याकडे केली. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती सायबर चोरट्याने दाखविली. ज्येष्ठ नागरिकाला तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या खात्यात साडेतीन लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

