पुणे : महाविद्यालयीन तरुणाचा महागडा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले.सचिन कैलास धिमधिमे (वय १८), शिवराज खेमचंद खेमावत (वय २०, दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चोरट्यांबरोबर असलेल्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत.

याबाबत इंद्रशीष चक्रवर्ती (वय २१, सध्या रा. मंगळवार पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंद्रशीष मूळचा कोलकात्ताच्या आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात आला आहे. इंद्रशीष आणि त्याचे मित्र रात्री पुणे स्टेशन परिसरातील हाॅटेलमध्ये जेवायला गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास इंद्रशीष जेवण करुन मालधक्का चौकातून जात होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे धिमधिमे आणि खेमावतने इंद्रशीषच्या हातातील ५० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. इंद्रशीषने आरडाओरडा केला. धिमधिमे, खेमावत आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन साथीदार वेगवेगळ्या दुचाकीवरुन पसार झाले.

त्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पेरणे, शेख, पिंगळे, वाईकर, पाटोळे, पवार, जगताप यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच तांत्रिक तपासात आरोपी धिमधिमे, खेमावत आणि साथीदारांनी मोबाइल हिसकावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.