पुणे : रविवार पेठेत एका सराफी पेढीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी १४ लाख ९५ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत सराफी पेढीचे मालक राजीव खताळ (वय ३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताळ यांची रविवार पेठेत रामलीला ही सराफी पेढी आहे. चोरट्यांनी सराफी पेढीच्या दरवाजाचे कुलूप तोडले. पेढीतून सोन्याचे, तसेच हिरेजडीत दागिने असा १४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करत आहेत.
लोहगाव-धानोरी रस्त्यावरील साठे वस्तीत एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत कांता चौधरी (वय ६२, रा. शिवकृपा निवास, साठे वस्ती, लोहगाव-धानोरी रस्ता) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी कुटुंबीय ११ जून रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. कपाटातील मूर्ती, सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ, रोकड असा ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस हवालदार आदलिंग तपास करत आहेत.
चंदननगर भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. याबाबत तुषार गुप्ता (वय ३१, रा. तत्त्व सोसायटी, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सदनिका बंद करून बाहेर गेले होते. सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सदनिकेत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून दागिने, राेकड असा ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.