मंचर, जुन्नरमधून चोरीला गेलेला २७०० किलो कांदा सापडला; चोरटे पसार

गेल्या पंधरवडय़ापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याची चढय़ा दराने विक्री होत असल्याने चोरटय़ांची नजर कांद्याकडे वळाली आहे. मंचर भागातील साकोरे गाव तसेच जुन्नर भागातून शेतकऱ्यांनी वखारीत ठेवलेला २७०० किलो कांदा चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, जुन्नर पोलिसांनी दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराला संशयावरून अडविले. तेव्हा दुचाकीची कागदपत्रे आणून देतो, असे सांगून दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार पसार झाला. पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या घरात साठवलेला २७०० किलो कांदा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तुळशीराम रामजी गाडे (वय ७४, साकोरे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी या संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव तालुक्यातील मंचर तसेच अन्य भागात कांद्याची मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यात येते. आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावातील रहिवासी तुळशीराम गाडे यांनी शेतातून काढलेला कांदा वखारीत साठविला होता. गाडे यांच्या शेतात गुरुवारी (१० ऑगस्ट) चोरटे शिरले. कांदा वखारीत ठेवलेल्या पंचवीस गोणी चोरून चोरटे पसार झाले.

पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत. दरम्यान, जुन्नर भागातील एका शेतक ऱ्यांच्या वखारीतून कांदा चोरीला गेला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. जुन्नर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी दुचाकीस्वार आणि त्यााच्या साथीदाराला संशयावरून थांबविले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तेव्हा कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. घरी जाऊन कागदपत्रे आणून देतो, असे सांगून दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार तेथून निघून गेले. पोलिसांच्या ताब्यात त्यांनी दुचाकी दिली. दरम्यान, त्यानंतर दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार परत आले नाही. तेव्हा पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून तपास सुरू केला. दुचाकी मालकाचा पत्ता शोधून काढला. तेव्हा घरात २७०० किलो कांदा साठवून ठेवल्याचे उघड झाले. जुन्नर, मंचर भागातून कांदा चोरीच्या प्रकरणात दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

गेल्या तीन वर्षांपासून कांद्याचे भाव उतरले आहेत. कांदा उत्पादक शेतक ऱ्यांना लागवडीतून फायदा होत नव्हता. त्यामुळे यंदा शेतक ऱ्यांकडून कांद्याचे उत्पादन कमी घेण्यात आले आहे. परराज्यातून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अनेक शेतक ऱ्यांना येत्या काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. अनेक शेतक ऱ्यांनी कांद्याची मोठय़ा प्रमाणावर साठवणूक केली आहे. एरवी घरातील चीजवस्तू, मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या चोरटय़ांची नजर कांद्याकडे वळल्याने मंचर भागातील शेतक री धास्तावले आहेत.