लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती रक्कम हस्तांतरण केंद्रामध्ये (मनी ट्रान्सफर सेंटर) ठेवून पैसे घेवून पसार होणाऱ्या चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला. बीड येथील दोन चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमधून चोरलेल्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.
अमृत भाऊसाहेब देशमुख (वय ४६), फारूक शब्बीर शेख (वय ३७, दोघे रा. सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहुरोडचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना देहूरोड पोलिसांनी ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये दोन चोरटे आढळले. ओळख निष्पन्न करून त्यांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
आणखी वाचा-पुण्यात आता ई- वाहने सुसाट! राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल
चोरट्यांनी सहा दुचाकी आळंदी-मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरुळी परिसरातील वेगवेगळ्या रक्कम हस्तांतरण केंद्रासमोर पार्क केलेल्या होत्या. शहरातून दुचाकी चोरायच्या. त्या दुचाकी एखाद्या रक्कम हस्तांतरण केंद्रासमोर नेऊन केंद्र चालकाला पैशाची अडचण असल्याचे सांगायचे. माझी दुचाकी येथेच ठेवतो, असे सांगून केंद्र चालकाकडून २० ते २५ हजार रुपये आपल्या खात्यात ऑनलाइन घेत आणि तिथून धूम ठोकत दोन्ही चोरटे थेट गाव गाठत. अशा प्रकारे त्यांनी सहा दुचाकी रक्कम हस्तांतरण केंद्रामध्ये लावल्या होत्या. इतर पाच दुचाकी त्यांनी आळंदी येथे लपवून ठेवल्या होत्या.